| अध्याय क्र. 28
|
 |
पैसा खर्च न ह्या सोहळी । फुले आणिले घरुनी ॥ प्रेमे गोविले हारासी । श्रध्दे अर्पिले गुरुसी ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ अदृश्य सृष्टी योजनी । अवतरता पुरुष भूमीवरी ॥ दुंदुभी वाजे नभी । आनंद सर्व लोकी ॥1॥ निळोबा संत जीवनी । आरती नित्य क्रमी ॥ सुरु करिता आरती । दुंदुभी वाजे अदृष्यी ॥2॥ पांडुरंग सदा कार्यी । लग्न, मंदिर कार्य असो काही ॥ रुप बदलूनी त्या वेळी । केले कार्य पदोपदी ॥3॥ येतो अनुभव ऐसाचि। माध्यान्ह आरती समयी ॥ एकटे असता दत्तवाडीसी । मिळे साथ अदृश्यी ॥4॥ आले कां कोणी । पहावे मागे वळूनी ॥ कोणी न दिसले कधी। ऐकू येई फक्त आरती ॥5॥ स्थान महिमा गुरुंनी । निर्माण केला दत्तवाडीसी ॥ कमी न पडले काही । सदा ईश सेवेसी ॥6॥ अशा अवतार पुरुषी । जन्मोत्सव होती जगी ॥ शक्ती मिळे त्यातूनी । प्रगती साधे साधकाची ॥7॥ मलिनता येता मनी । ती कमी होते उत्सवी ॥ तरतरी येई मनी । उत्साह भरे अंतर्बाह्यी ॥8॥ राख बसता अग्नीवरी । निस्तेज होतो अग्नी ॥ काुंफ्कूनी उडविता राखेसी । प्रज्वलीत होतो अग्नी॥9॥ तैसेचि जन्मोत्सवी । दृश्य अदृश्य वातावरणी ॥ निरुत्साह होऊनी कमी । उत्साह भरतो मनी ॥10॥ विकल्प राख मनाची । उडून जाते उत्सवी॥ धार येते उपासनेसी । प्रगती होते त्यातूनी ॥11॥ सत्संगतीने तुटे कुबुध्दी । सत्संगतीने जळे पाप राशी ॥ भक्ता दृश्य अदृश्यी । संवेदना मिळे उत्सवी ॥12॥ नम्र, प्रामाणिक चिकित्सकासी । उत्तर मिळे उत्सवी ॥ समाधाने जातो घरी । प्रसन्नता येते मनी ॥13॥ निष्ठावंत भाव मनी । काय कमी त्या अध्यात्मी ॥ तप बले गुरुंनी । साधली कित्येकाची प्रगती ॥14॥ ऐसे सत्पुरुषांची । जन्मोत्सव करिती जगी ॥ प्रेरणा मिळण्या अखंडी । दृश्य अदृश्य शक्तीची ॥15॥ गावे वाटते गुरुराया । तव जन्मोत्सव सोहळा ॥ द्वादशीसह त्रयोदशीचा । जन्म शनिवार दिना ॥16॥ पंचाहत्तर जन्म दिना । अदृश्य सृष्टी योजना ॥ किती वेळा शिष्या । उत्सवा नकार दिला ॥17॥ जगन्नाथ शास्त्रीला । होकार धार्मिक विधीला ॥ संधी मिळता शिष्यांना । उत्साह सर्वांच्या मना ॥18॥ सर्वांनी भाग घेण्याचा । निर्णय मनी घेतला ॥ गवगवा सत्कार इच्छा । नसे कधी गुरुराया ॥19॥ विरोध पत्र पत्रिकेला । वर्गणी यादीसी नसे थारा ॥ गुरु शिष्य परिवारा । घरच्या घरी सोहळा ॥20॥ तीन दिवस सोहळा । शास्त्र शुध्द कार्यक्रमा ॥ प्रारंभ गुरुवार दिना । गणेश पूजन सोहळा॥21॥ शुक्रवारी प्रारंभ यज्ञा । भीमरथी यज्ञ नामा ॥ सायंकाळी जलयात्रा । सूचना एकच सर्वा ॥22॥ पंचाहत्तर कलशा । आमंत्रण सुवासिनींना॥ कलश विडयाचे पाना । नारळ नसे आवश्यका ॥23॥ आणिले किती नारळा । अदृश्य सृष्टी योजना ॥ पालखीसह जलयात्रा । निघाली बरोबर पाचला ॥24॥ सनई मृदंग टाळ घंटा । नाद निनादला दशदिशा ॥ सुवासिनी शिरी कलशा । लाज लज्जा न कोण्या मना ॥25॥ गुरु स्नाना जल आणण्या । उत्साह असे सर्वा मना ॥ कलश शिरी स्त्री रांगा । डोळे दिपले दृश्य पाहता ॥26॥ महाजनवाडीसी पोहचता जलयात्रा। ठेविती कलश विहिरी काठा ॥ जगन्नाथ शास्त्री मोजता कलशा । दोन कमी पंचाहत्तरा ॥27॥ ठेविता दोन पंचपात्रा । चमत्कार म्हणा त्याला॥ अदृश्य सृष्टी योजना म्हणा । दोन सुवासिनी येती त्या स्थला ॥28॥ पंचपात्र उचलोनिया । ठेविले दोन कलशा ॥ नक्की पंचाहत्तरा । सुवासिनी योजना ॥29॥ एक कमी एक जास्त ना । तंतोतंत संख्या जाणा ॥ ऐसा प्रथम दिन सोहळा । डोळे भरुनी पाहिला ॥30॥ झाली कलशांची पूजा । विहीर जला आवाहना । घेतले पवित्र मंत्र जला । पालखीसह परतली यात्रा ॥31॥ बत्त्या प्रकाश असे जाणा । धार्मिक विधी पुन्हा॥ पोहचता दत्तवाडी जलयात्रा । ओवाळिती सुवासिनी पालखीला ॥32॥ प्रदक्षिणा यज्ञस्थाना । सुवासिनी जाती यज्ञमंडपा ॥ ओतती जल भव्य गुंडा । जो ठेविला असे यज्ञ मंडपा ॥33॥ सर्व यज्ञ देवता । आवाहन प्रत्येक दिना ॥ स्थापना ज्यांची शुक्रवारी । आस्तिंत्व सर्वांचे त्या स्थला॥34॥ सुरवात प्रवचन कार्यक्रमा । गुरुवार पासुनिया ॥ जोशी बाळशास्त्री माहूरकरा । योजिले पहिले प्रवचना ॥35॥ जगन्नाथ शास्त्रीसी प्रेरणा । वर्णिती दत्तवाडी अनुभवा ॥ भाग्य आपुले जाणा । दत्त अवतारी पुरुष सोहळा ॥36॥ शनिवारी प्रवचना । कविश्वर शास्त्री योजना ॥ गुळवणी महाराज व्यास पीठा । ज्यांची असे योजना ॥37॥ जन्म दिन उगवला । रविवार असे या वेळा ॥ द्वादशी तिथी पाहोनिया । सनई नाद दुमदुमला ॥38॥ प्रत्येक शिष्या घरी । घाई मठात येण्याची ॥ विचार एकच मनी । आज गुरु जन्म तिथी ॥39॥ झाला नाही कधी । म्हणून हा पहिलाचि ॥ जन्म उत्सव आजी । उत्साह प्रत्येका मनी ॥40॥
|