| अध्याय क्र. 6
|
 |
ऐकता रुद्र स्वरासी । चकित झाले कुळकर्णी ॥ ऐसे स्वर न ऐकले कधी । खात्री विशेषत्त्व या ब्राह्मणी ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ प्रबल इच्छेत असे शक्ती । प्रयोगी येते प्रचिती ॥ अंतर्मने पाठविता लहरी । परिणाम होई अंतर्मनी ॥1॥ इच्छा नसतां त्यांची । आघात करे इच्छा शक्ती ॥ इच्छा होई त्यांची । कार्य करिती अदृश्य लहरी ॥2॥ ऐसे प्रयोग सत्ययुगी । तैसे गुरु प्रयोग कलियुगी ॥ असे अवतार गुरु पीठी । निर्माण सत्ययुग कलियुगी ॥3॥ गुरुनाथ अवतार दत्तपीठी । देवगुरु दत्तात्रेय असती ॥ देवॠषी नारद असती । स्वल्प नसे त्यांचे जवळी॥4॥ अपार देण्याची वृत्ती । न अरं ददाति इति नारद: ॥ ॠषींची सरळ वृत्ती । ॠजू सरळ ते असती ॥5॥ राजा देवांचा त्यासी । इंद्र ऐसे म्हणती॥ ऐसे होती इंद्र किती । एकानंतर एक गादीवरी ॥6॥ कृत त्रेता द्वापार कली । चक्राने युग निर्मिती ॥ सोम मंगल बुध गुरु । शुक्र शनी रवि चक्री ॥7॥ अवताराची तीच रीती । प्रत्येक गादीवरी दत्तचि । गुरु अवतार गुरु पीठी । दत्तात्रेय अवतार निश्चिती ॥8॥ जे जे घडले गुरुचरित्री। ते ते घडले या अवतारी ॥ वर्णिता एक एक त्यासी । आनंद वाटे मनी ॥9॥ संस्कार करिती अंतर्मनी । जेथे विकल्प न येती ॥ अन्य विचार तेथ नसती । संस्कार करिती तेथेचि ॥10॥ मन न होई दु:खी । संस्कार होई उच्च मनी ॥ वृत्ती बदले त्यातूनी । विचार लहरी सोडूनी ॥11॥ सोडिता विचार लहरी । जाती संकल्पीत मनी ॥ प्रवेश करिती मनी । प्रेरणा देती त्यासी ॥12॥ जगा वेगळी पध्दती । प्रयोग करिती गुरु ऐसेचि॥ विज्ञान कलियुगी । प्रयोगावरी भर अति ॥13॥ अध्यात्म जीवनी । प्रयोगाची नितांत जरुरी ॥ गुरुनाथा हे ठाऊकी । प्रयोगे देती प्रचिती॥14॥ स्वल्प नाही गुरुजवळी । श्रध्दा निष्ठे विणलेली झोळी ॥ करिता पुढे निर्धारी । मिळे भक्ता सर्व कांही ॥15॥ विकल्प संदेहे फाटे झोळी । न लागे काही हाती ॥ सर्वांची नसे सारखी भक्ती । जैशी मती तैशी सिध्दी ॥16॥ गुरुचा दोष नाही काही । धडे भक्ती-भांडे जरुरी ॥ श्रध्दे तडा जाता गळे सर्वही । श्रध्दा ढळे ती नसे श्रध्दा खरी ॥17॥ असती गुरु सरळचि । ज्याची श्रध्दा असे जशी ॥ त्याचे पदरी पडे तेचि । अपूर्ण श्रध्दे नसे कांही ॥18॥ प्रत्येक अवतार कार्यी । अधिकत्व दिसे काही ॥ कार्य असे एकचि । भिन्नत्व असे प्रयोगी ॥19॥ अवतार दुष्ट संहारी । अवतार भक्त तारावयासी ॥ परी भिन्नता दिसे निाश्चिंती । राम कृष्ण अवतारी ॥20॥ श्रीपाद श्रीवल्लभ अवतारी । कार्य भिन्न नरसिंह सरस्वती ॥ गुरुनाथ या अवतारी । अधिकत्व दिसे कार्यी ॥21॥ गुरु परब्रह्म अवतरविती । फुले येती परब्रह्म बागी ॥ दरवळे सर्वत्र सुगंधी। योगायोग सुंगंध मिळे जीवनी ॥22॥ सुगंधी वातावरण प्रयोगी । सर्व भक्त अनुभविती ॥ ऐसा प्रयोग भांबेरी ग्रामी । प्रचिती आली भांबेरी क्षेत्री ॥23॥ असती भक्त कृष्णराव कुळकर्णी । नित्य येती गुरु दर्शनासी ॥ उपासनेवरी भर अति । चर्चा चाले नित्य त्यांची ॥24॥ धारणा शक्ती प्रयोग । बोलिले गुरू एक दिन ॥ त्या प्रयोगासी करण्यास । इच्छा झाली गुरु मनात ॥25॥ कृष्णराव सांगती ते समयी । जावाई कथा सविस्तरी ॥ जावाई आले एक वेळी । भांबेरी ग्रामी घरी ॥26॥ जाता देवमास्तर मंदिरी । केली प्रतिज्ञा सर्वा समोरी ॥ येणार नाही आता कधी । मी या भांबेरी ग्रामी ॥27॥ प्रतिज्ञा करितां गेले घरी । वाईट वाटले सर्वांसी ॥ काय करावे आता यासी । घडले हे भाऊसाहेब मूर्ती समोरी ॥28॥ योगायोग जाणा तुम्ही । गुरुनाथ आले भांबेरी ग्रामी ॥ घटना सांगती गुरुसी । काही वर्षे झाले म्हणती॥29॥ गुरु म्हणती त्यासी । विश्वास असे जर मनी ॥ कंटाळा नको प्रयोगी । श्रध्दा ठेवा पूर्ण मनी ॥30॥ प्रयोग सांगती त्यासी । विचार लहरी सोडा तुम्ही ॥ संस्कार करा अंतर्मनी । प्रेरणे येतील ते भांबेरीसी ॥31॥ सोडा विचार लहरी । सर्व कुटूंब मिळूनी ॥ वेळ ठरवा निश्चित तुम्ही। कार्य होईल निश्चिती ॥32॥ प्रयोग असे साधा जरी । सातत्य पाहिजे त्यामध्यी ॥ प्रेम धागा पाहिजे मनी । यश मिळे प्रेम धागी ॥33॥ वेळ ठरली रात्री । झोपेपूर्वी बसू म्हणती ॥ ऐसे सांगता गुरुसी । प्रयोग सांगती गुरु त्यासी ॥34॥ मन करा एकाग्री । विचार आणा एकचि ॥ बसा सर्व एक स्थळी । शांतता ठेवा त्या जागी ॥35॥ जावाईबुवा आणा मनी । चित्र उभे करा समोरी ॥ सांगा त्यांना अंतर्मनी । भांबेरीस या तुम्ही ॥36॥ भांबेरी गांवी येण्यासी । विचार लहरी सोडा तुम्ही ॥ आदळती त्या लहरी । त्यांचे अंतर्मनावरी ॥37॥ त्यांचे बाह्य मनी। विरोध असो किती ॥ प्रेरणा मिळेल त्यासी । येतील अंतर्मने भांबेरीस ॥38॥ योग्य मुहूर्त ठरवूनी । प्रारंभ केला प्रयोगी ॥ मनुष्य स्वभाव ऐसाचि । फलाची त्याला घाई ॥39॥ उत्सुकता असते त्यामध्यी । परिणाम काय प्रयोगी ॥ पत्र टाकती जावायासी । तुम्ही या भांबेरी ग्रामी॥40॥ पत्रोत्तर येई त्यासी । नाही येणार तुमच्या गावी ॥ सांगती उत्तर गुरुसी । परिणाम नाही काही ॥41॥ गुरु म्हणती त्यासी । पत्र कां टाकिले तुम्ही ॥ सुरु ठेवा तुम्ही तेचि । कार्य होईल सहजचि ॥42॥ सुरु ठेविती जिद्दी । लहान थोर सर्वही ॥ एकशे आठवे दिवशी । जावाई आले भांबेरीसी ॥43॥ आश्चर्य वाटले सर्वांसी । पत्र न येता काही ॥ आले कसे भांबेरीसी । विचारिती सर्व त्यासी ॥44॥
|