| अध्याय क्र. 26
|
 |
गुरु सांगती शिष्यासी । मागीतले मी देवासी ॥ बावीस दिवस आयुसी । पुढील जन्मीचे आयुष्यी ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ उपवास अनुष्ठान जोडी । असे ज्यांचे जीवनी ॥ उपवासा वाचून कधी । केले नाही अनुष्ठान एकही ॥1॥ बावन दिवस अखंडी । असती पारायणे गुरुचरित्री ॥ उपवास बावन दिनी । सांगता अनंत चतुर्दशीसी ॥2॥ दत्तजयंती सप्ताही । भोजन प्रसाद काला दिनी ॥ तपस्या ही जीवनी । तपोबल दिसे क्षणोक्षणी॥3॥ संकटे येवो कितीही । विरोधकाची झाली खच्ची ॥ दत्तवाडीची प्रगती । धीर गंभीरतेतूनी ॥4॥ प्रशांत सागरी । वादळे होवो कितीही ॥ लाटा त्या कितीही । शांत नीर असे तळी ॥5॥ वनस्पती वाढे तळी । मासे जगती तळी ॥ वादळ परिणाम नाहीं। शांत असे तळी ॥6॥ उन्हाळा कडक किती । पाने गळती किती ॥ वृक्षा येती नवीन ती । पलरूवी कितीतरी ॥7॥ बाह्यांगी ऊन किती । अंतरी मूळ खोल अति ॥ तिथे न ऊन काही । ओलावा झरा खाली ॥8॥ अध्यात्मी अडचणी । असती फक्त बाह्यात्कारी ॥ अंतरी शांत अति । त्यातूनी साधे प्रगती ॥9॥ कर्म असे संसारी । त्यात आनंद कमी ॥ सुख त्यात कमी । मना ताण भारी ॥10॥ कर्म जे परमार्थी । कष्ट असोत किती ॥ आनंद त्यात भारी। टिके सुख अंतरी ॥11॥ आपत्ती ज्या पूर्वकर्मी । त्या भोगण्यावाचूनी ॥ गती नसे काही । दु:ख त्यात निश्चिती ॥12॥ आपत्ती ज्या परमार्थी। परीक्षा घेण्या येती ॥ त्या भोगता मनी । उत्साह राहे जीवनी ॥13॥ उत्तीर्ण परीक्षेमध्यी । आनंद मना अति ॥ अनुत्तीर्ण त्यामध्यी । हुरहूर वाटे जीवनी ॥14॥ कर्म भोगता क्षणी । माझे नाही कांही ॥ ऐसे वाटता मनी । सुख वाटते भोगता ॥15॥ माझ्यात नाही कांही । माझे नाही कांही ॥ ही गुरुवृत्ती अखंडी । आनंद असे रोमरोमी ॥16॥ जेथे 'कांही नाही' ही वृत्ती । तेथेच असे सर्वही ॥ वाटे माझ्यात असे सर्वही । तेथेच नसे कांही ॥17॥ गुरु दक्षता क्षणोक्षणी । सांगती सर्व येणाऱ्यासी ॥ येथे नाही कांही । हे लिखाण फलकावरी ॥18॥ गुरुंची नम्र विनंती । श्रध्दाळू, भाविक चिकित्सकांसी ॥ लहान थोर सर्वांसी । स्त्री आणि पुरुषासी ॥19॥ प्रार्थना कळकळीची । विचार करण्या शांतपणी॥ मुद्दे स्पष्ट देऊनी । इच्छा तृप्तीस वेळ द्या नंतरी ॥20॥ पहिला मुद्दा लिखाणी । भूत भविष्य वर्तमानी ॥ गुरु स्पष्टता भारी । कळत नसे मला कांही ॥21॥ कळण्याची इच्छा नसे मनी । जरी कळते त्यात कांही ॥ हिंडलो असतो कां असा मी । उलट प्रश्न सर्वांसी ॥22॥ दुसरा मुद्दा योगाभ्यासी । जमत नाही गुरु सांगती ॥ केला नाही मी कधी । येईल कसा मजसी ॥23॥ योगाभ्यास करण्याची । इच्छा जर माझे मनी ॥ राहिलो असतो कां मी । या अशा जन समुदायी ॥24॥ तिसरे वैराग्य अंगी । मुळीच नाही म्हणती ॥ प्रत्येक वस्तूत अजूनी । मन पकड असे कायमची ॥25॥ स्वतंत्र जागा करुनी । विहीर झोपडी सर्वही ॥ आवश्यक वस्तू संग्रही । वास्तव्य करितो दत्तवाडीसी ॥26॥ चवथ्याने स्पष्टता मनी । वर्गणी, निधी , कधी ॥ ऐसा छंद नाही मनी । नाही केले पहिल्यापासूनी ॥27॥ गुरु प्रार्थना हीचि । ऐसा छंद फंद पुढती ॥ लागण्या दुर्बुध्दी । होऊ नये मज कधी ॥28॥ शंका समाधान पाचवी । स्पष्टता उत्तर त्यासी ॥ माझ्याच शंका अति । दुसऱ्यासी कसे करु समाधानी ॥29॥ शंका न संपल्या माझ्याचि । असता ऐसी परिास्थिंती ॥ शंका निरसन दुसऱ्याचे तरी । काय व कसे करु मी ? ॥30॥ सहावे धर्माचे ज्ञान अद्यापि । व्हावयाचे आहे म्हणती मजसी ॥ होईल ऐसे वाटत नाही । कारणाची स्पष्टता देती ॥31॥ धर्मनिष्ठ कोण जगती। धर्मनिष्ठतेचे बुरख्या खाली ॥ राजकारण खेळूनी । सत्तेची हाव कोण धरती ॥32॥ धर्मनिष्ठ कोण । धर्मनिष्ठतेचा आव आणती कोण ॥ यातील फरक काय । हेच कळले नाही अजून ॥33॥ सातवे रोग चिकित्सा औषधी । अभ्यास केलेला नाही कधी ॥ मीच घेतो अधून मधूनी। डॉक्टरांची औषधी ॥34॥ मग आता सांगा तुम्ही । मी आहे कां त्यात ज्ञानी ॥ औषधी योजना मी । करु शकेल कां सांगा तुम्ही ॥35॥ आठवा पंथ पक्ष संस्थी । इतक्या संकुचितपणानी ॥ वागण्याची रक्तातचि । सवय नसे जीवनी ॥36॥ पंथ पक्ष संस्था या साची । बसले नाही जीवन कधी ॥ बसूच नये त्या साची । ऐसे ध्येय असे अंतरी ॥37॥ बिदागी दक्षिणा नववी । त्यासी सांगती प्रथा इथली ॥ आरती वा यादी फिरवूनी । प्रथा नाही घेण्या देण्याची ॥38॥ बुवा, साधु, संन्यासी । याची इच्छा कार्यक्रमाची ॥ अपेक्षा जर पैशाची । कार्यक्रम नको या स्थळी ॥39॥ दहावा मुद्दा गुरु लेखी । कीर्तन प्रवचन उपदेशासी ॥ गुरु स्पष्टता या मुद्दी । पात्रता नाही माझी ॥40॥ मनाची आवड म्हणूनी । करीत असतो कीर्तन प्रवचनासी ॥ ना लोकांच्या करमणुकीसी । अथवा प्रसन्न करण्या लोकांसी ॥41॥ करमणुक वा प्रसन्न करुनी। काही मिळविण्या हेतू नसे मनी ॥ या हेतू कीर्तन प्रवचनासी । पाहिले नाही, पाहत नाही कधी ॥42॥ अकरावा साक्षात्कार सिध्दी । अनुभव नाही मजसी ॥ हे सामर्थ्य माझ्यात नाही । ऐसे स्पष्ट गुरु सांगती ॥43॥
|