| अध्याय क्र. 35
|
 |
रस्ता बंद पाहून । बसल्या एकदम तेथ ॥ म्हणती आपसात । ना दत्तवाडी ना घर ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥स्वयंभू स्थान दत्तवाडी। निर्माण केले गुरूंनी ॥ स्वयंभू तत्त्व गुरूमुखी । स्वयंभू सर्व जगी ॥ 1॥ प्रत्येक व्यक्ती जगी । असे स्वयंभूचि ॥ जो तो चालतो भूवरी । आपुलेच पायांनी ॥2॥ स्वयंभू पाहिजे जगी । परावलंबी व्यर्थचि ॥ बोलतो खातो स्वमुखे । स्वनेत्रे बघतो सृष्टीसी ॥3॥ कान ऐकण्या त्याचेचि । हात कार्या त्याचेचि ॥ हालचाल स्व शरीरी । बुध्दी कार्य स्वयंभूचि ॥4॥ कर्म संचित त्याचे । स्वयंभू जीवन त्यांचे ॥ कार्य स्वयंभू त्याचे । गुरू स्वयंभू क्षेत्री ॥5॥ स्वयंभू श्रेष्ठ गुरूशक्ती । स्वयंभू क्षेत्र प्रयोगी ॥ त्रिकाल पूजा आरती । गुरू वास त्या घरी ॥6॥ त्रिकाल पूजा आरती । नित्य क्रम दत्तवाडीवरी ॥ दत्तात्रेय वास क्षेत्री । स्वयंभू प्रयोग अनुभूती ॥7॥ दत्तात्रेय वास अनुभूती । घंटी प्रत्यक्ष द्वादशीसी । नरसिंह सरस्वती जन्मदिनी । पालखीत बैसले ही अनुभूती ॥8॥ औदुंबर स्वयंभू । प्रत्येक क्षेत्री स्वयंभू ॥ प्रत्येक उत्सवासी स्वयंभू । प्रवचन कीर्तनकार किती ॥9॥ उत्सवा साहित्यात । स्वावलंबी असती आज ॥ मंडप भांडी सर्व। ध्वनीवर्धक बिछाईत ॥10॥ उपासना स्थान निमिर्ती । त्याने गुरु शक्तीची ॥ कळली सर्वा महती । क्रम तो वर्षभरी ॥11॥ गुढी पाडवी मुहूर्ती। रामविजय ग्रंथ पठणासी ॥ सुरू होते दत्तवाडी क्षेत्री । राम नवमी उत्सवा समाप्ती ॥12॥ गुढी पाडवा दिनी । गळती ठेवती पिंडीवरी ॥ समाप्ती त्याची जेष्ठमासी । शुध्द द्वादशी दिनी ॥13॥ आषाढी पौर्णिमे दिनी । गुरूपूजन दिनभरी ॥ शिष्या आनंद त्या दिनी । शिष्याची असे गर्दी॥14॥ बावन दिवसाची पोथी । चाले अखंड दिनरात्री ॥ गुरूचरित्र पठणासी । येती शिष्य आपुले पाळी ॥15॥ गणेश चतुर्थी दिनी । स्थापुनी गणपतीसी ॥ श्री गजानन विजय ग्रंथाची । पारायणे होती अखंडी ॥16॥ स्त्री पुरूष लहान थोर । येती शिष्य पारायणास ॥ सांगता दोन्ही पारायणास । होते अनंत चतुर्दशीसी ॥17॥ कोजागरी पोर्णिमेसी । येती शिष्य पालखीसी ॥ दूध प्रसाद देऊनी । कोजागरी होते साजरी ॥18॥ गुरूद्वादशी उत्सवासी । आठ दिवस आधी ॥ सुरवात प्रदक्षिणेसी। अहोरात्र चाले प्रदक्षिणा ॥19॥ आश्विन वद्य द्वादशी । काला होऊनी त्या दिनी ॥ प्रसाद मिळे सर्वासी । जे घालती प्रदक्षिणेसी ॥20॥ कार्तिक शुध्द द्वादशी । चातुर्मास समाप्ती ॥ सर्व भजन मंडळी । असती प्रसादासी ॥21॥ दत्त जयंती उत्सव । प्रमुख या क्षेत्रात ॥ मार्गशीर्ष पौर्णिमेस । सुरूवात आधी पोथीस ॥22॥ जन्म अध्याय पौर्णिमेस । गुरू चरित्र सप्ताह ॥ होतो आधीच पूर्ण । कीर्तन प्रवचन सप्ताह ॥23॥ काला कीर्तन झाल्यावर । प्रसादा गर्दी अलोट ॥ श्रध्दा निष्ठा काय । कळे या उत्सवात ॥24॥ पौष शुध्द द्वितीयेस । नरसिंह सरस्वती जन्म ॥ जन्म होतो बारास । जन्मोत्सव म्हणती त्यास ॥25॥ माघ वद्य प्रतिपदेस । शैलगमन उत्सव ॥ माघ वद्य द्वादशीस । असे गुरू जन्मोत्सव॥ 26॥ जन्मोत्सव दिनी असे । पालखी प्रमुख कार्यक्रम ॥ उपासना होते त्यात । कोणावर नसे भार ॥27॥ रात्री महाशिवरात्रीस । शिवलीलामृत पारायण । रुद्र अभिषेक अखंड । प्रसाद उपासकास ॥28॥ गुरूवार पौर्णिमेस । पालखी उपासनेस शिष्य॥ येती दत्तवाडीवर । आनंद त्यांना त्यात ॥29॥ असा नित्य नैमित्तिक । क्रम चाले सतत॥ फल त्याचे आज । भव्य दिव्य झाले सर्व ॥30॥ उपासना स्थान आज । प्रसन्न वातावरण तेथ ॥ कोणीही येता आत । शांत प्रसन्न वाटे त्यास ॥31॥ गुरू अस्तित्वे सर्व । उपासना करिती तेथ ॥ तेच गुरूचे निर्माण कार्य । वर्णन कसे शब्दात ॥32॥ अध्यात्मात प्रगती जाण । होते उपासनेने निश्चित ॥ श्रध्दा बलवत्तर गुरूवर । असता तरतो शिष्य ॥33॥ सागरात पोहणाऱ्यांचे । लक्ष पाहिजे बेटाकडे ॥ संसार सागरात पोहणाऱ्यांचे । लक्ष पाहिजे गुरुकडे ॥34॥ बेटाकडे लक्ष देऊन । पोहणे योग्य समुद्रात ॥ तसे उपासना मार्गात। स्थिर श्रध्दा लागे गुरूवर ॥ 35॥ नको भावना जाळ । त्याचा नसे उपयोग ॥ खेळविते भावना जाळ । इकडे तिकडे मानवास ॥36॥ जशी समुद्रातील लाट । इकडून तिकडे जातं ॥ तैसे भावना जाळ। करिते अस्थिर जीवन ॥37॥ स्थिर होण्या जीवन । स्थिर श्रध्देची जरूर ॥ श्रध्दा असेल स्थिर । उपासनेत यश निश्चित ॥38॥ उपासनेने शक्ती । निर्माण होता काही ॥ अपेक्षा निर्मिती मनी । होते त्या बरोबरी ॥39॥ उपासना शक्ती आणि । कल्पना अपेक्षा म्हणा त्यासी ॥ मेळ न बसे कधी । कल्पना फक्त मनोरंजन करी ॥40॥ श्रध्दा उपासना जीवनी । असती एकत्र जरी ॥ श्रध्दा घडवी उपासनेसी । मार्गदर्शन घडे उपासनेतुनी ॥41॥
|