| अध्याय क्र. 41
|
 |
प्रकाश किरणे मूर्तीतूनी। पसरली दाही दिशी ॥ मूर्ती तेजोमय करण्याची । शक्ती असे गुरु अंगी ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ प्रत्येकाचे हृदयी जगन्नाथ । ते प्रकटण्या शक्तीची जरुर ॥ करिता उपासना थोर । प्रकटले हनुमंत हृदयी राम ॥1॥ हनुमंत शक्ती थोर । महिमा तो अपरंपार ॥ वर्णू शके ऐसा कोण । कृती केली तो धन्य ॥2॥ अनुभूतीवीण सर्व शीण । अनुभूती जीवन प्रत्यक्ष ॥ जीवन सार्थकी तेथ । ऐशा गुरुपदी होऊ लीन॥3॥ जन्मा येतो मनुष्य । देह असे दृश्य रुपात ॥ तो अशाश्वत जड देह । अपूर्णत्व असे त्यात ॥4॥ परावलंबी हा देह । होईल कधी कालवश॥ हे सांगणे कठीण । यासाठी हे तात्पुरतेपण ॥5॥ डोळयाने दिसे देह । त्यात असे मेन्दू प्राण ॥ कातडी केस बाहेर । अंतरी रक्त मांस हाड॥6॥ हा नाशिवंत देह । तरी वाटे मी म्हणजे देह ॥ अन्य नसे दुसरे जाण । ही श्रध्दा देहबुध्दी जाण ॥7॥ हे असे पूर्ण अज्ञान । देहो ऽ हम् म्हणे निरंतर ॥ त्यासाठी करी धडपड । वासना तृप्तीच जीवन ॥8॥ अदृश्य त्याचे मन । संस्कार आठवणीचे भांडार ॥ करी कल्पना योजनाच । देह वासनेसाठी सर्व ॥9॥ भावना वासना विचार । कल्पना अहंकार हे मन ॥ न दिसता करिते पूर्ण । संकल्प कार्या जाण ॥10॥ वाल्मीकीने केले काय । संकल्पे मारिले असंख्य लोक ॥ तुलसीदासे केली नदी पार । संकल्पे केला सापाचा दोर ॥11॥ ही देहबुध्दी पूर्ण । वासना तृप्तीसाठी धडपड ॥ देह वासना जोवर । तोवरी तुम्ही दास ॥12॥ जोवरी सूक्ष्म विचार सोडून । म्हणे मीच असे देह ॥ हीच श्रध्दा नि:शंक । तीच देहबुध्दी जाण ॥13॥ मनाचा हा सर्व खेळ । गुंतागुंती अति मनात ॥ अशी विविधता मनात । कुठे न आढळे जगतात ॥14॥ मनाचा पहाण्या अंत । जो होतो सावधान ॥ सिध्द होता त्यासाठी पूर्ण । तेच जाणा आत्मदर्शन ॥15॥ मी नाही देह । मी नाही मन ॥ मी नाही बुध्दी जाण। आत्मा हेच मीपण ॥16॥ दृश्य सोडूनी अदृश्य । जड सोडूनी सूक्ष्म ॥ अज्ञान सोडूनी ज्ञान । याचा असे हा खेळ ॥17॥ अदृश्य सृष्टी मोठी जाण । त्याचाच हा सर्व खेळ ॥ आपण कठपुतळी पूर्ण । खेळविते ती आपणास ॥18॥ आपले न यात कर्तृत्व । कर्तृत्व पूर्ण अदृश्य सृष्टीत ॥ ही प्रचिती घेऊन । करिता जीवन विचार ॥19॥ ही नि:शंक श्रध्दा । मनात उदय पावता ॥ मी म्हणजे आत्मा । ही आत्मबुध्दी जाण ॥20॥ अदृश्य सृष्टीवर । श्रध्दा बसता पूर्ण ॥ देहबुध्दीचा होई अंत । जीव बुध्दीत होते पदार्पण ॥21॥ परमार्थाचे हेच रहस्य । देह तादात्म्य असे जोवर ॥ तोवरी असो आम्ही दास । देह बुध्दी म्हणती त्यास ॥22॥ जीवतादात्म्य पुढचे जोवर । तूं परमात्मा मी आत्मा भिन्न ॥ ही जाणीव पक्की जाण । जीव बुध्दी म्हणती त्यास ॥23॥ दोघांचा होता अंत । परमात्मा आत्मा एक ॥ तू आणि मी एक । आत्मबुध्दी तीच जाण ॥24॥ असे हे रहस्य । अनुभवेल तो धन्य ॥ तेच अवतारी पुरूष । कार्य करिती जगतात ॥25॥ एकनाथ महाराजांचे जीवन । अभ्यासता कळते रहस्य ॥ बालपणी देहतादात्म्य । सेवा केली देवगिरीत ॥26॥ गुरू त्यांचे स्वामी जनार्दन । श्रध्दे करिती काम ॥ पूजे आधी देवघर साफ । गंध उगाळून ठेविती तयार ॥27॥ फुले पाणी हार । आसन करिती सज्ज ॥ सेवेत त्यांचे जीवन । दास्यत्व पत्करले हंसत ॥28॥ दास्यत्वातच आनंद । ईश दर्शनाची ओढ ॥ देहाकडे नसे लक्ष । जीवतादात्म्य स्थिती मनात ॥29॥ प्रसन्न स्वामी जनार्दन । पाहून त्यांच्या मनास ॥ दत्त दर्शनाची ओढ । अंतरी कळता स्वामीस ॥30॥ देहतादात्म्य येता संपुष्टात । नेले स्वामीनी शिष्यास ॥ औदुंबर वृक्षा समीप । करविले दत्त दर्शन ॥31॥ प्रसन्नता न वर्णवेल। शब्द अपुरे ब्रह्मांडात ॥ अनुभव प्रमाण त्यात । अनुभवेचि ते कळेल ॥32॥ जीवतादात्म्य असता । दत्त तो परमात्मा ॥ एकनाथ तो आत्मा। तू परमात्मा मी आत्मा ॥33॥ हा अनुभव पूर्ण । करिती सेवा रात्रं दिन ॥ होण्या प्रगती जीवनात । तत्पर असती सदा सेवेत ॥34॥ असता स्वामी ध्यानमग्न । शत्रू आक्रमण संदेश ॥ ध्यानमग्न गुरूशी पाहून । चढविला गुरूचा वीरवेष ॥35॥ शत्रू पराभव करून । आले एकनाथ परत ॥ स्वामीसी कळता तो विचार । म्हणती जीवतादात्म्य नाही येथ ॥36॥ तू व मी असे एक । अहं ब्रह्माास्मिं लय ॥ तेच झाले परमेश्वर। तेच अवतार पुरूष ॥37॥ कार्य केले थोर । 'नर करणी करे सो ॥ नर का नारायण होत' । हे सत्य या प्रक्रियेत ॥38॥ या अध्यायीचा हेत। घटना त्यांच्या जीवनात ॥ दत्त अवतारी विष्णुदास । सहज होईल आकलन ॥39॥ जन्मोजन्मीचे सुकृत । फला येते ज्या जन्मात ॥ तो जन्म धन्य । सर्वांना मानिती अंश ॥40॥ असे श्रीपाद श्रीवलरूभ । पहिला दत्त अवतार ॥ दुसरा अवतार नंतर । झाला करंज नगरीत ॥41॥
|