श्री गणेशाय नम: । श्री गुरूभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ पूर्व कर्म घेऊनी । मनुष्य येई जन्मासी ॥ सहज भोगणे कर्मासी । हा स्वभाव नाही जगी ॥1॥ अज्ञान असे बालपणी । अहंकार तरुणपणी ॥ मीच करितो वाटे सर्वांसी । ईश्वर शक्तीची कल्पना कमी ॥2॥ ईश्वराकडे वळण्यासी । निकड पाहिजे मनी ॥ आपुल्या वेगी गाडी । प्रवेश नाही या क्षेत्री ॥3॥ आजारी झाल्यावाचूनी । प्रवेश नाही रुग्णालयी ॥ प्रवेश मिळण्या या मार्गी । दु:ख पाहिजे कोठेतरी ॥4॥ कोणी शरीरी आजारी । आर्थिक दुखणे कोणासी॥ अडले काम होण्यासी । कोणा पुत्राची जरुरी ॥5॥ एक ना अनेक कारणी । मनुष्य मन दु:खी ॥ आस्था वाटे देवाची । प्रवेश करी या मार्गी ॥6॥ मन अपेक्षे दु:खी । तळमळ वाटे मनी ॥ ईश्वर ध्यास लागे मनी । त्यातूनी घडे भक्ती काही ॥7॥ मन मुख्य उपासनेसी । मनाने घडे सर्वही ॥ मन संकल्पी शक्ती । गुरू अनुभव शिष्यासी ॥8॥ एकदा ठरले कार्यक्रमासी । कीर्तन सोनाळा ग्रामी ॥ भोजन प्रसाद वारीवरी । हनुमंत मंदिर दरबारी ॥9॥ गुरू होकार त्यासी । गाडया येतील आधी ॥ ऐसे ठरता निश्चिती । गुरू संकल्प दर्शनासी ॥10॥ योगायोग आधले दिनी । अवचित आले वादळासी ॥ पाऊस पडला एकाएकी । गाडी न चाले त्या मार्गी ॥11॥ पेंड झोंबती गाडीसी । येऊ न शकली बैलगाडी॥ गुरू म्हणती सर्वांसी । चला जाऊ पायी ॥12॥ खोटे वाटले सर्वांसी । शब्दासाठी गुरूची तयारी ॥ बत्ती पेटविली रात्री । निघाले सर्व ब्राह्म मुहूर्ती ॥13॥ अडचणी येवोत कितीही । शब्दाप्रमाणे करु आपण तरी ॥ आंधळा जरी बरोबरी । सोनाळया गेलो आम्ही ॥14॥ पेंड झोंबती पायी । अंधार होता रात्री ॥ आश्चर्य वाटले लोकासी । ऐसा बुवा न पाहिला म्हणती ॥15॥ प्रभाव त्याचा मनावरी । गुरू अधिकार कळला त्यासी ॥ वारी भोजन करूनी । कीर्तन झाले सोनाळयासी ॥16॥ मन टोक अध्यात्मी । शब्दाची किंमत अति ॥ संकल्प केला एकवेळी । पूर्ण करती संकटे सारूनी ॥17॥ ऐसेचि भांबेरी मुक्कामी । गुरू गेले पाथर्डीसी ॥ गुढग्या पर्यंत गाऱ्यासी । तुडवूनी गेले संकल्प वेळी ॥18॥ ऐशी संकल्पी शक्ती । शब्द देता पूर्ण करिती ॥ शब्द निघता मुखातूनी । तत्पर देव पूर्ण करण्यासी ॥19॥ पूर्णता गुरूंची सर्व क्षेत्री । तृप्तता त्यांची सर्व क्षेत्री ॥ कशाची न त्यांना कमी । सर्वोत्कृष्ट सर्व क्षेत्री ॥20॥ श्रीदत्त अवतार भूमीवरी । अवतार कार्या योजना ती ॥ निर्मळ ते जीवनी। सात्त्वि वृत्ती सत्पुरुषांची ॥21॥ जगी द्वेष अति । वर्चस्व मान न दुसऱ्यासी ॥ म्हणूनी निंदक निंदती । शरण जाती शेवटी संतासी ॥22॥ ऐसी जगी रीत पुराणी । त्याची न पर्वा संत करिती ॥ धीर गंभीर त्यांची वृत्ती । कार्य प्रभावे उत्तर त्यासी ॥23॥ जन्मोजन्मीचा संबंध काही । म्हणूनी आज गुरूची भेटी ॥ प्रत्येक शिष्याची पुण्याई । कमी अधिक असे काही ॥24॥ ताराबाई पिंपरकर नामी । शिक्षिका म्हणूनी तेल्हारी ॥ असे भाऊ जगन्नाथ शास्त्री । दत्त मंदिरी आकोट ग्रामी ॥25॥ सासर त्यांचे परतवाडी । दैवयोगे वैधव्य नशिबी ॥ दर्शना येती दत्तवाडी। गुरू सेवा त्यांचे भाग्यी ॥26॥ अनेक जन्मापासूनी । शिष्यत्व योग निश्चिती ॥ फल त्याचे या जन्मी । स्वयंपाक नित्य मठासी ॥27॥ मीना त्यांची भाची । शिक्षणा आली तेल्हारी ॥ राहण्यासी गावी खोली । दर्शना जाती नित्य मठासी ॥28॥ मॅट्रिक पास झाल्यावरी । मीना मुक्काम आकोट ग्रामी ॥ व्याधी उद्भवली अंगी । चट्टे सर्व अंगावरी ॥29॥ डॉक्टर वैद्य सर्वांही । उपचार केले शास्त्रींनी ॥ उपयोग न झाला काही । शरण आली गुरूसी ॥30॥ शरण येता गुरूसी । गुरू सांगती मीनासी ॥ श्री देवी माहात्म्य पोथी । नित्य वाच श्रध्देनी ॥31॥ त्यात खंड नको काही । नित्य कर पारायणासी ॥ वेळ एक पठणासी । एकग्रता ठेव मनी ॥32॥ खंड नाही मासिक पाळी । चार दिवस खंड जरी ॥ अखंड अनुष्ठान मानती । ऐसे करी अष्टोत्तर शतासी ॥33॥ व्याधी तळमळ अंत:करणी । पूर्ण केले एकशे आठासी ॥ कोणत्याही अनुष्ठानासी। सांगतेची नितांत जरुरी ॥34॥ परिणाम गुरू शब्दी । चट्टे गेले सर्वही ॥ औषधी जिथे निरुपयोगी । तेथे कार्य झाले अध्यात्मी ॥35॥ सांगता आमंत्रण गुरूसी । योग माझा गुरू सोबती ॥ श्री सूक्त अभिषेक देवीसी । गुरू पूजनाची तयारी ॥36॥ गुरू आसन चौरंगावरी । पुरूष सूत्तेफ् केले पूजनासी ॥ पाद प्रक्षालन करूनी । गंध पुष्पहार गुरूसी ॥37॥ आरती, कर्पूर आरती । मंत्राक्षदा गुरू शिरी ॥ पांच प्रदक्षिणा गुरूसी। पूजा देखिली नयनी ॥38॥ ऐसी गुरूपूजा पहिली । पाहूनी आनंद मनी ॥ आरती घेतली सर्वांनी । प्रसाद दिला शिष्यांसी ॥39॥ भोजना ब्राह्मण सुवासिनी । नऊ कुमारिका प्रसादासी ॥ गंध पुष्पवेणी सर्वांसी । पूजन केले मीनानी ॥40॥ वस्त्र दक्षिणा देऊनी । तृप्तता कुमारिकांची॥ गुरु प्रसन्नता मनी । व्याधी गेली निघूनी ॥41॥