| अध्याय क्र. 19
|
 |
गणपती जयघोष करुनी । उचलली मूर्ती गुरुंनी ॥ योगायोग होता माझाही । सहा जणांनी उचलिले मूर्तीसी ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ संसार असारच म्हणती । त्यात नाही कोणी सुखी ॥ धडपड सुखासाठी त्याची । प्रयत्नात नसे कमी ॥1॥ प्रयत्ने सुख थोडेचि । अचानक घडे काही ॥ व्यस्त सांगड जीवनी। प्रयत्न व सुख दोघांची ॥2॥ थोडया प्रयत्ने मिळण्याची । त्याची असे इच्छा मनी ॥ त्यातून त्याची देववारी । नवस सायास देवासी ॥3॥ संसार बलवान करण्याची । इच्छा असे सतत मनी ॥ कच्ची भिंत संसाराची । पक्की होण्याची मनीषा मनी ॥4॥ देवासी विनवी क्षणोक्षणी। पक्की करा वीट संसारी ॥ पूजा उपासना भक्ती । पक्की करण्या संसारी विटासी ॥5॥ विलंब लागे प्रत्येक कार्यी । प्रयत्ने न जुळे सर्वही ॥ योगायोग नाही म्हणती । यशाची इच्छा असे लवकरी ॥6॥ चमत्कार दाखवा म्हणती । एकदम कार्य अपेक्षिती ॥ विद्युत दीप लागे दाबता गुंडी । तैसे कार्य व्हावे देवाकडूनी ॥7॥ अपेक्षा असे चमत्काराची । श्रध्दा नसते तेवढी ॥ योग्य निष्ठा किंमती वाचूनी । चमत्कार घडणे अशक्य॥8॥ चमत्कारा पाहिजे शक्ती । शक्ती वाचून नाही कांही ॥ शिव झाल्या वाचूनी । शिवदर्शन अशक्य ॥9॥ उपासने मिळे शक्ती । शक्तीतून मिळे सर्वही ॥ शक्तीतून चमत्कारही । घडती या भूवरी ॥10॥ अवतार पुरुष शक्ती । चमत्कार तेथे घडोघडी ॥ भक्ती श्रध्दा निष्ठेनी । साक्षात्कार चमत्कार भेटी ॥11॥ भाग्य माझे आजी । योगायोग म्हणा त्यासी ॥ चमत्कार देखिला नयनी । गुरुकृपा असे खरी ॥12॥ तेल्हारा गाडेगाव नाक्या जवळी । बांधिले गणपती मंदिरासी ॥ करिती विनंती गुरुसी । स्थापना करा मूर्तीची ॥13॥ कल्पना न आधी कांही । गुरु इच्छा नकार देण्याची॥ प्रेरणा एकदम गुरुसी । होकार दिला मूर्ती स्थापनेसी ॥14॥ संवेदना केंद्र विमानतळी । दिनरात घेई संवेदनासी ॥ जागृतता अखंड या यंत्री। नोंद केव्हाही विमानाची ॥15॥ गुरु संवेदन केंद्री । दिनरात असे जागृती ॥ नोंद होई केव्हाही । अदृश्य सृष्टी संदेशी ॥16॥ गुरु जाता स्थापनेसी । मी प्रत्यक्ष होतो सोबती ॥ अति भव्य गणेशमूर्ती । अति जड संगमरवरी ॥17॥ मुहूर्त वेळ स्थापनेसी । मूर्ती उचलली सर्वांनी॥ आठ दहा तरुण शक्ती । सहा इंच उचलूनी ठेविली खाली ॥18॥ बारा इंच ओटयावरी । प्रयत्न मूर्ती उचलण्यासी ॥ उचलून ठेविती पुन्हा खाली। न जमे ठेवणे ओटयावरी ॥19॥ लाकडे आणण्या एकासी । पाठविले त्यांनी नेटा देण्यासी ॥ लाकूड नेटा न बरोबरी । मूर्ती निसटेल लाकडावरुनी॥20॥ गुरु विचार मनी । आलो मूर्ती स्थापनेसी ॥ उचलू आपण मूर्ती । चला म्हणती पूढे आपण ॥21॥ गुरु गेले मूर्ती जवळी । केला नमस्कार मूर्तीसी ॥ दोघेही एकरुप म्हणूनी । विनंती केली कुलदैवतासी ॥22॥ परंपरा पटवर्धन घराणी। गणपती पूजा पिढयानुपिढी॥ गणपती होऊनी गणपतीसी । प्रार्थना करिती मनी ॥23॥ माझ्यात नाही शक्ती कांही । गहूभर न हाले मजकडूनी ॥ आपले प्रेरणे उचलतो मी । पूर्ण करा आपले कार्यासी ॥24॥ गणपती जय घोष करुनी । उचलली मूर्ती गुरुनी ॥ योगायोग होता माझा । सहा जणांनी उचलिले मूर्तीसी ॥25॥ सर्वामुखी वाक्य एकचि । गुरु हात लागला मूर्तीसी ॥ उचलली गेली ती मूर्ती । जी न उचलली बारा जणांनी॥26॥ चमत्कार हा म्हणती । गुरुंची ती अगाध शक्ती ॥ गुरु जवळ ते बोलती । चर्चा करिती सर्वामध्यी ॥27॥ गुरु म्हणती त्यासी। सर्वांनी उचलले मूर्तीसी ॥ लागता सर्वांची शक्ती । उचलल्या गेली मूर्ती ॥28॥ तेन पटले कोणासी । संचालक येता सांगती त्यासी ॥ गुरु स्पर्श होता मूर्तीसी । उचलल्या गेली प्रचंड मूर्ती ॥29॥ परिणाम त्याचा सर्वांवरी । चमत्कारे वळती विरोधकही ॥ नम्र झाले गुरु चरणी । स्तुती करिती शक्तीप्रत्ययी ॥30॥ अदृश्य सृष्टी योजना ती । चमत्कार विरोधका वळवण्यासी ॥ शक्तिप्रत्यय सर्वांसी । ऐसा चमत्कार तेल्हारा ग्रामी॥31॥ नित्य अडचणी संसारी । दूर व्हाव्या वाटे मनी ॥ विनंती करिती गुरुसी । दूर करा अडचणी ॥32॥ कोणी पुत्र मागती गुरुसी । कोणी पैसा मागती गुरुसी ॥ आजार बरा करण्या विनंती । गुरुकृपे मान्य होई ॥33॥ गणेश रामचंद्र म्हणूनी । नाना पाटील नामे ओळखती ॥ आकोटचे ते रहिवासी । ब्रुकबाँड कंपनीत तेल्हारी ॥34॥ त्यांची श्रध्दा गुरुवरी । दर्शना येती मठासी ॥ अरुण जेष्ठ पुत्र त्यासी । सदा असे आजारी ॥35॥ नित्य ज्वर वर्षानुवर्षी । नित्य डॉक्टर औषधी ॥ ज्वर न गेला अंगातूनी । परिणाम त्याचा शिक्षणावरी ॥36॥ डॉक्टर तर्क भिन्नचि । त्याने चिंता नाना मनी ॥ चिंतातूर पाहूनी शिष्यासी । दया आली गुरु मनी ॥37॥ आकोटहूनी येता दत्तजयंतीसी । अरुणसी बोलाविले जवळी ॥ हात फिरविती शरीरावरुनी । नित्य ज्वर गेला दूरी ॥38॥ ज्वर आला गुरु शरीरी । आजार घेतला गुरुंनी ॥ मर्यादित केले ज्वरासी । भोगण्या चमत्कार त्यासी ॥39॥ नित्य ज्वर दूर जाऊनी । वार्षिक ज्वर येई त्यासी ॥ ऐसे होता सहा वर्षी । भोग संपविला गुरुंनी ॥40॥ नवस केला नानांनी । व्रतबंध दत्तवाडीवरी ॥ नानाचे आप्तइष्टासी । आवड नव्हती त्याची ॥41॥ काळजी सर्व गुरुसी। मदत नव्हती आप्तांची ॥ गुरु होते पाठीराखी । आप्तांचे न चालले काही ॥42॥
|