| अध्याय क्र. 37
|
 |
गुरु हस्ते प्रकाशनासी । दिली प्रत नागपुरी ॥ सोहळा मी डोळयांनी । पाहिला त्यावेळी ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: । श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ दत्तपीठी गुरु आरुढ । प्रेम तेथे ओतप्रोत ॥ देशप्रेम, राष्ट्रप्रेम । समाज प्रेम, व्यक्ती प्रेम ॥1॥ व्यक्ती व्यक्तीवर प्रेम । उसने का असे प्रेम ॥ माता पित्याचे प्रेम । जिव्हाळा ओसंडे तेथ ॥2॥ देखावा नसे तेथ । शुध्द प्रेम रोमारोमात ॥ कल्याण सर्वांचे मनात । त्यानेच सांगती गुणदोष ॥3॥ श्री. गुरुच प्रेम । ओत प्रोत प्रेम ॥ तिथे न दुसरे जाण । शिष्याप्रती प्रेम ॥4॥ समाजप्रती प्रेम । देशासाठी प्रेम ॥ राष्ट्राविषयी प्रेम । सर्व माझे हा भाव ॥5॥ शिष्या प्रती प्रेम । हे कळे क्षणोक्षण ॥ अपेक्षारहित प्रेम । हे आगळे जीवन ॥6॥ अनोळखी कोण । आला जरी अचानक ॥ त्याची व्यवस्था सर्व। जशी पूर्वीचीच ओळख ॥7॥ जसे घनिष्ठ संबंध । पूर्व जन्म संबंध ॥ चहा भोजन मग सर्व । त्या प्रेमाला न शब्द ॥8॥ त्याचा प्रश्न काय। अपेक्षित उत्तर त्यास ॥ मिळेल निश्चित मग । बोलण्यात कळते त्यांस ॥9॥ प्राणशक्ती ओतून । त्याचे करिती समाधान ॥ त्यात गुरुस आनंद । येणाऱ्यास पूर्ण आनंद ॥10॥ एक एक मिळून । होत असे समाज ॥ त्या समाजाप्रती प्रेम । असे ओतप्रोत ॥11॥ कळकळ ती भिन्न । मातेची ती तळमळ ॥ कळे कसे दुसऱ्यास। ज्याचा अनुभव त्यास ॥12॥ दत्तवाडी क्षेत्र । समाजाचे प्रतीक ॥ एक एक व्यक्ती तेथ । विचार करिता कळे तत्त्व ॥13॥ पूर्ण समाज एक । बनून राहणे अनुभव ॥ सर्वांचे असे संघटन । गुरुंचे ते कौशल्य ॥14॥ मांजर कुत्रे हरिण । यांचे असे तेथ सख्य ॥ द्वैत भावरहित । ते असे गुरुचे प्रतीक ॥15॥ प्राण्याचे हरते शत्रुत्व । तेथे मनुष्या कां द्वैत ॥ श्रध्दा निष्ठा वृत्त्ती ही जात । दुसऱ्या जातीचे न काम ॥16॥ गोविंदराव कुळकर्णी तेथ । असती बीडकर महाराज शिष्य ॥ दादा लोखंडकार सेवेत तत्पर । वाघाचे गेले सेवेत जीवन॥17॥ विठ्ठल दामधर तेथ । होता सेवेत मग्न ॥ प्रवचन करी चमत्कारीक । गुरु कृपे सार्थ जीवन ॥18॥ उमाळे शालीग्राम । गुरु कृपा त्याच्यावर ॥ एम्.ए.बी.एड. शिक्षक । या सर्वाभूती प्रेम ॥19॥ तेथील उपासना विचार । पुजारी मनोहर देव ॥ पालखी घेती दौलतरामजी एक । दुसरे आवदे, गुरु योजनाच ती ॥20॥ तिसरे बाळापुरे देविदास । जात पूसा ज्याची त्यास ॥ सर्वा विषयी एक भाव । गुरु प्रेमे संघटित सर्व ॥21॥ गुरु इच्छे नळकांडे महादेव । राम विजय ग्रंथ पाठ ॥ करिती नवमी पर्यंत । प्रल्हाद बुवाचे उत्सवी कीर्तन ॥22॥ एकादशी वारी आनंद । पाथर्डीवासी ओंकारास ॥ जातीचा तेथे न संबंध । श्रध्दे भक्त जमती सर्व ॥23॥ दत्तवाडी सेवेकरी शिष्य । मी आणि ते एकच ॥ हा गुरुचा असे भाव । घटने कळते मन ॥24॥ लोखंडकारा उदर विकार । अकोल्यास नेण्या आली वेळ ॥ गुरुसी सलरूा देती शिष्य । भरती करा जनरल वॉर्डात ॥25॥ गुरू उत्तर त्यास । पेईंग वॉर्डात करा नोंद ॥ ते आणि मी एक । दुसरे नाहीच ते येथ ॥26॥ तोच अनुभव सर्वास । नारायण वाघाचा तो आजार ॥ चार चार डॉक्टर सलरूेस । प्रेम ते ओत प्रोत॥27॥ अकोल्यास नेण्यास वाघास । केली स्पेशल मोटार ॥ परत आणण्यास स्पेशल । दुजा भाव कसा तेथ ॥28॥ शेवटची व्यवस्था मग । केली गुरूंनी सर्व ॥ दिगंबरा दिगंबरा निनादात । घंटा टाळ मृदंग सोबत ॥29॥ हे आगळे प्रेम । समाजभूती असे म्हणून ॥ उत्सवात दिसे उत्साह। बनले समाजाचे प्रतीक ॥30॥ आहे कां राष्ट्रप्रेम । विचारिती विचारवंत प्रश्न ॥ सत्पुरुषाइतके प्रेम । नसे कोणाजवळ निश्चित ॥31॥ त्यासाठी मला एक । कळले जे स्वप्नाचे उत्तरात ॥ बासष्ट सालची गोष्ट । चीनचे झाले आक्रमण ॥32॥ गुरू विचार तीव्र । करावे हिमालय पर्यटन॥ चीन आक्रमण केंद्र । शोधावे प्रत्यक्ष जाऊन ॥33॥ त्यासाठी निमित्त । हिमालय यात्रा तीर्थ क्षेत्र ॥ ठरला हा विचार । देश राष्ट्र प्रेम मनात॥34॥ मला पडले स्वप्न । एक लाल पिवळे फूल ॥ पडले देवा समोर । गुरूस विचारिला अर्थ ॥35॥ त्या स्वप्नाचा संबंध । होता गुरू कार्यात ॥ गुरू उत्तर स्पष्टीकरणार्थ । देती पूर्ण उकलून ॥36॥ चीन आक्रमक केंद्र । प्राणपणाने काढावे शोधून ॥ त्यासाठी ठरला बेत । करावी यात्रा हिमालय क्षेत्र ॥37॥ केले रहित दत्त मार्गदर्शनी । लाल चीनचे, पिवळे क्षेत्राचे प्रतीक ॥ तो विचार कळला तुम्हास । संबंध तुमचा विशेष ॥38॥ या राष्ट्र प्रेमेच । राष्ट्रात चैतन्य भरण्यास ॥ गुरू प्रेरणा विजयरावास । श्री छत्रपती चरित्रास ॥39॥ तुझ्या हाती नाही काही । कैसे करिसी या जीवनी ॥ गुरू प्रेरणेत सर्व काही । चालू दे जीवन गुरू प्रेरणी ॥40॥
|