| अध्याय क्र. 39
|
 |
त्या दत्तबागेत आश्रम । गुरुंनी बांधला छान ॥ मुख्य आश्रमाचे माप । पूर्वीचे ॠषिमुनी आश्रम ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरुभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ दत्तवाडीसी चर्चा नित्य नवी । वर्णन अशक्य ते शब्दी ॥ ज्याचा विषय त्या शिष्य मनी । बिंबतसे अंत:करणी ॥1॥ ऐशा चर्ची एक दिनी । विषय पडला कानी ॥ आपण देतो मुदत देवासी । त्याने लागे वेळ त्यासी ॥2॥ आज नाही उद्या कर । उद्या नाही परवा कर ॥ महिन्याने तरी कर । वर्षाने तरी कर॥3॥ अशी मुदत परोपरी । देतो आपणचि कार्यासी ॥ मन पडते त्यात कमी । त्याने वेळ लागे कार्यासी ॥4॥ आताचि करा कार्यासी । ऐसा संकल्प नसतो मनी ॥ आताचि करा ऐसी । धार नसते मनाची ॥5॥ गुरुचरित्र अध्यायी । एक मूढ ब्राह्मण कथी ॥ स्नान संध्या त्यागुनी । बैसला देवी पुढती ॥6॥ स्वप्न नाही पाहूनी । अर्पिली जिव्हा तोडूनी ॥ तरी नाही अनुभूती । सिध्द मनी शिर अर्पिण्यासी ॥7॥ निर्धार मनी अति। त्याने प्रसन्न देव होती॥ मुदत नाही पाहूनी । देवी मार्गदर्शन त्यासी ॥8॥ देवी व गुरुदर्शन त्यासी । जीवन सार्थक निश्चिती ॥ मुदत आज आणि आताचि । विद्या आली त्याच क्षणी ॥9॥ दुसरी कथा श्री. गजानन पोथीसी । शिष्य गेले सर्व पंढरपुरी ॥ आले सर्व दर्शन घेऊनी । बापूना काळे तसाचि ॥10॥ मनाची धार एकचि । आताचि पाहिजे दर्शनासी ॥ गजानन महाराजांनी । विठ्ठल दर्शन करविले तेथे ॥11॥ सर्वांना उत्तर देती । बापूना सारखे मन करा आधी ॥ तरीच घडेल दर्शनासी । एरव्ही कैसे आजी ॥12॥ दत्तवाडीवरी अनुभूती । निर्मलाबाई आवदेसी ॥ गुरु एकदा झाले आजारी । शौच व्याधी थकवा भारी ॥13॥ दर्शन केले बंद सर्वासी । संबंध घनिष्ठ म्हणूनी ॥ आली संध्याकाळी दर्शनासी । प्रबल इच्छा भेटण्याची ॥14॥ दत्तवाडी येता तिसी । कळले दर्शन बंद आजी ॥ कालवा कालव मनी । दर्शन इच्छा तीव्र मनी॥15॥ सुरु होती सायं आरती । बसली खाली भुयारी ॥ दिसते दरवाजातूनी । श्री दत्तमूर्ती पूर्ण उभी ॥16॥ विचार तीव्र मनी । दर्शन घेऊ आजी॥ भेट घेऊ गुरुची । तळमळ ती अंत:करणी ॥17॥ तीन शिरे सहा हाताची । मूर्र्ती होती समोरी ॥ एक शिर हात दोनचि । गुरु दिसले समोरी॥18॥ डोळे उघडे म्हणूनी । विश्वास होता मनी ॥ जागृती ती मनी । गुरु दिसती जटाधारी ॥19॥ पांढरे धोतर अंगात । सदरा तो पांढराच ॥ उपवस्त्र दिसले स्पष्ट । श्री दत्त झाले गुरु ॥20॥ दत्ताने दिले दर्शनासी । गुरु रुपात येऊनी ॥ श्री दत्त अनुभूती ही । मीच आहे विष्णुदास ॥21॥ शरीर हे नाशिवंत । करा आजचि निर्धार ॥ क्षणाचा नसे भरवसा येथ । मुदत नको कार्यात ॥22॥ गुरुचा असा संकल्प । मुदत नाही त्यात ॥ याच वर्षी विहीर । याच वर्षी घर ॥23॥ याच वर्षी पंप । याच वर्षी वीज ॥ याच वर्षी पीक । एक नाही तीन तीन ॥24॥ हा अनुभव आज । इच्छा मनी आज ॥ दत्तबाग सिध्दस्थान । पाहू आज थोडा फार ॥25॥ प्रथम पासून पूर्व वृत्तांत । पूर्व वातावरण निर्माण ॥ चित्र उभे करण्या जरुर । म्हणून देतो थोडक्यात ॥26॥ शेत सहा एकर । मिळाले गुरुंना म्हणून ॥ मनोहर देवाचे नावावर । केले गुरुंनी जाण ॥27॥ त्यात शेतात जाऊन । बसती गुरु रोज ॥ योजना अदृश्य सृष्टीत । कळली गुरुंना निश्चित ॥28॥ संकल्प केला मनात । विहीर झोपडी तेथ॥ निवांत स्थान चिंतनास । सडकेपासून दूर ॥29॥ एकांतवासाची आवड । मन रमते तेथ ॥ आश्रमाचा बेत । ठरला गुरु मनात ॥30॥ विहीर मुहूर्त ठरवून । गेले गुरु त्र्यंबकेश्वरास ॥ अक्षय तृतीयेस । खोदण्या सांगितले देवास ॥31॥ मार्गदर्शन मज पवमाना । श्री औदुंबरी जप करिता ॥ दिसली तुलशी माला । एक मंडल बारा पवमाना ॥32॥ मार्गदर्शन दुसरे मंडला । एक घरी एक दत्तवाडीला ॥ दोन मंडल सांगता। मार्गदर्शन मज स्वप्नी ॥33॥ आले गुरु त्र्यंबकेश्वराहूनी । प्रत्यक्ष घडले तसेचि ॥ अक्षयतृतीया आधले दिनी । पूजन घडले प्रत्यक्ष ॥34॥ त्या स्वप्नी रिध्दी सिध्दी । पिवळया मूर्ती दृष्टी ॥ हात कमरेवरी उभ्या दोन्ही । सूचना रिध्दी सिध्दी स्नानाची ॥35॥ एकोणीसशे एक्यांशी साली । अक्षय तृतीया बुधवारी ॥ गुरु चालले गाडीतूनी । विहीर मुहूर्त करण्यासी ॥36॥ शांत वातावरणासाठी । आश्रमाची योजना गुरुंची॥ साकार करण्या जगी । चालले गुरु गाडीतूनी ॥37॥ दोन बैलगाडया बरोबरी । अनेक शिष्य सोबती ॥ गणपती कलश पुजूनी । गुरु हस्ते मारली कुदळी ॥38॥ कुदळी मुहूर्त साधूनी । मुहूर्त नारळ फोडूनी ॥ वाटला प्रसाद त्या स्थळी । अदृश्य सृष्टी योजना ती ॥39॥ परत निघालो गाडीतूनी । आनंद ओसंडे गुरु मनी ॥ शब्द निघाले मुखातूनी । तत्त्व ते शब्दाशब्दातूनी ॥40॥
|