| अध्याय क्र. 8
|
 |
सुगंध इतका माळेसी। सुगंध किती शरीरी ॥ सुगंध किती स्वभावी । सुगंध किती मनी ॥ |
श्री गणेशाय नम: । श्री गुरूभ्यो नम: । श्री कुलदेवताभ्यो नम: ॥ श्री महालक्ष्म्यै नम: । श्री सरस्वत्यै नम: ॥ निर्मळ अंत:करणी । संस्कार शुध्द उमटती ॥ पांढऱ्या स्वच्छ कागदी । लिहा अक्षरे कोणतीही ॥1॥ शुध्द भाव मनी । परिणाम होती त्या मनी ॥ संवेदनक्षमता येई । विनासायास त्या मनी ॥2॥ परमेश्वरा आवडी । शुध्दता असे ज्यामध्यी ॥ निर्मळता सहवासी । त्यांना सदा गोडी ॥3॥ स्वच्छता प्रत्यक्षचि । सुगंधता प्रत्यक्षचि ॥ स्वरुपता प्रत्यक्षचि । निर्मलतेची प्रत्यक्ष मूर्ती ॥4॥ उत्कृष्ट सद्गुण मनी। विशेषत्व त्यांचे अंगी ॥ सुगंध दरवळी । कणाकणातूनी ॥5॥ उपमा न सौंदर्यासी । स्वच्छता नाही त्याहूनी॥ उच्चतम गुण अंगी । स्पर्शी उतरविण्या शक्ती ॥6॥ मन बल प्रचंडचि । जे इाच्छिंती ते होई ॥ इच्छा शक्ती असे ती । इच्छे मागे सुप्त शक्ती ॥7॥ प्रकाशमय शक्ती ती । अंधार नष्ट करण्या शक्ती ॥ ज्योतीस्वरुप शक्ती ती । प्राणशक्तीने देती ज्ञानासी ॥8॥ प्रकाश द्रव्य भक्ताजवळी । दाखविती अनेक दृश्यासी ॥ नाद द्रव्य ज्यांचे जवळी । नादब्रह्म ऐकविती त्यासी ॥9॥ गंधद्रव्य ज्यांचे जवळी । घाणेंद्रिया असे शक्ती ॥ सुगंध अदृश्य सृष्टीतूनी । सुगंध देती त्यासी ॥10॥ जे असे ज्याचे जवळी । ते ते प्रेरिती त्यासी ॥ अनुभव देण्या शक्ती । अनुभव येती भक्तासी ॥11॥ हरिश्चंद्र आमले नामी । भक्त असे खापरखेडी ॥ गुरू असता मळयासी । नित्य येती ते भांबेरी ॥12॥ गुरू अनुष्ठान औदुंबरी । गुरूचरित्र पठण वृक्षातळी ॥ श्रवणा येती नित्यचि । प्रसाद घेती नंतरी ॥13॥ नित्य अनुष्ठान झाल्यावरी । स्वयंपाक गुरू करिती ॥ दाळ भाजी एकत्र ती । शिजविती एका भांडी ॥14॥ चार पोळया नित्य । करिती त्या झोपडीत ॥ गुरू घेती दोन । दोन देती भक्तासी ॥15॥ खाता दोन पोळी । तृप्तत्ता वाटे भोजनी ॥ स्वादिष्टता त्या अन्नी । वर्णू न शके कोणी ॥16॥ तो क्षण आठविता आजी । आनंद वाटे त्यांचे मनी ॥ उपमा नसे दुसरी । मिष्टान्नाहूनी त्यात गोडी ॥17॥ दासबोध झाल्यावरी । अस्वस्थता आली मनी ॥ श्रमाचा ताण शरीरी । प्रकृती बिघडली थोडी ॥18॥ आले आबाराव घरी । विश्रांती देण्या शरीरी ॥ हरिश्चंद्र आले भेटीसी । बसले गुरू जवळी ॥19॥ गुरू ब्रह्माची ती मूर्ती । गुरू विष्णू स्वयंम् असती ॥ रोमरोमी परब्रह्माचि । उत्कृष्टता सर्व जवळी ॥20॥ गुलाब पुष्प सहवासी । सुगंधता येई त्यामध्यी ॥ अत्तर ठेविता कापडी । सुगंध दरवळे कापडी ॥21॥ कांही द्रव्ये भक्ता अंगी । अनुभव घेण्याची इच्छा मनी ॥ गुरू देती हरिश्चंद्राजवळी । रुद्राक्षमाळ हाती ॥22॥ वास घ्या म्हणती । वास कशाचा विचारिती ॥ वास घेता सांगती । अत्तर सुगंध रुद्राक्षमाळी ॥23॥ शंकरा ऐसीचि प्रचिती। लावले असेल अत्तर त्यासी ॥ शंका न रहावी कांही । गुरू कटाक्ष हा क्षणोक्षणी ॥24॥ गुरू म्हणती त्यासी। अत्तर लागले असेल कधी ॥ धुवूनी टाका माळेसी। स्वच्छ करा पाण्यानी ॥25॥ धुतले देशमुखे माळेसी । स्वच्छ करिता तिन्ही वेळी ॥ वास कशाचा माळेसी । नीट पहा वास घेऊनी ॥26॥ धुता दोन तीन वेळी । वास घेतला त्यांनी ॥ वास होता पहिलाचि । फरक न पडला कांही ॥27॥ स्वयंभू शक्ती गुरूची । वास सुगंध स्वयंभूचि॥ जाईल कैसा धुतल्यावरी । स्वयंपूर्ण सुगंधता ती ॥28॥ कळले त्या भक्तासी । ईश सुगंध हाचि ॥ रोमरोमी सुगंध तोचि । ईश्वर अंगी वर्णिती ॥29॥ सुगंध इतका माळेसी । सुगंध किती शरीरी ॥ सुगंध किती स्वभावी । सुगंध किती मनी ॥30॥ भक्त योग्यता जैशी । तैसा सुगंध त्यासी ॥ तळमळ असे जेवढी । तेवढेचि देती भक्तासी ॥31॥ पंधरा शक्ती दीपी । पंधराचि विद्युत प्रेरिती ॥ जास्त कैसे देती । फ्यूज जाईल त्याच क्षणी ॥32॥ शक्ती वाढविती त्याची । एकदम नसे या क्षेत्री ॥ निष्ठा ज्याची जशी । अनुभव येती त्यासी ॥33॥ श्रीमंत गरीब भेद नाही । निष्ठा भेद त्यामध्यी ॥ लहान मोठा भेद नाही । श्रध्दा पाहती त्याची ॥34॥ बाहय स्वच्छता कितीही । अंतरी स्वच्छता पाहिजे खरी ॥ ती असे ज्याचे जवळी । सुगंध लाभ मिळे त्यासी ॥35॥ निर्मळता नुसती बाहयी । मलिनता नको अंतरी ॥ तरीच श्रीहरी भेटी । भेट होईल अंतर्मनी ॥36॥ अनुभव येतो त्यासी । जो शरण जातो गुरूसी ॥ ऐसे ऐकिले आजवरी । अहंकारे न मिळे कांही ॥37॥ गुरूचरित्र नित्य औदुंबरी । तीर्थ लाभ भक्तासी ॥ सामर्थ्य असे त्यामध्यी । पवित्र ईश जली ॥38॥ तुकाराम ठोकळ नामी । भक्त एक भांबेरीवासी ॥ येत असे कधी कधी । दर्शना गुरूच्या मठात ॥39॥ घरची होती गरिबी । पोट भरी मजूरी करूनी ॥ कर्म बलवत्तर जीवनी । घटना घडती सुख दु:खी ॥40॥ संसारी मुले बाळे त्यासी । संसार करी कसातरी ॥ एक मुलगी त्यासी । लहान होती वयाने ॥41॥ योगायोग विचित्रचि। एक कुत्रे पिसाळले गांवी ॥ कुत्रे चावले मुलीसी । रक्त आले बाहेरी ॥42॥ घरगुती उपाय केले कांही । सलरूा सर्व त्यास देती ॥ आकोल्याला न्या तुम्ही । उपचार करा जाऊनी ॥43॥ पिसाळलेल्या कुत्र्यानी । अपाय होईल मुलीसी ॥ राहू नका भांबेरीसी । त्वरा करा उपचाराची ॥44॥
|